छोटे क्षण, छोट्या कविता

आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला भरभरुन काही सांगावसं वाटतं, व्यक्त करावंसं वाटतं. हे क्षण असे शब्दांच्या चिमटीत कसे पकडणार असा प्रश्न आपल्याला पडतो. काळाच्या ओघात झर्रकन निघून जाणारे हे क्षण आपण शब्दबद्घ करु शकलो तर?
हे क्षण काही मोठे, लक्षात रहावेत असे नव्हेत. रोजच्या जीवनात रोज घडणा-या काही गोष्टा कधि नवा चेहरा घेऊन सामो-या येतात, आणि आपण भारावून जातो.
रोजच्याच गर्दीभरल्या ट्रेनमध्ये एक जवळची मैत्रिण आपल्याला अचानक भेटते.
कितीतरी दिवस मनापासून जपलेल्या गुलाबाच्या रोपाला एका सकाळी एक छान कळी आलेली असते.
आपलं बाळ पडतं. रडतं. आपल्या कुशीत शिरतं.
रात्री बायकोसोबत फिरायला गेल्यावर पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो. एक साधी जेवणानंतरची शतपावली एकदम छान होऊन जाते.
एक ना अनेक क्षण असं आपलं आयुष्य आनंदी करत असतात. या क्षणांना कायम आपल्यापाशी शब्दांकित करुन ठेवता आलं तर तो एक कमालीचा रोमांचक अनुभव होतो. माझ्या आयुष्यातल्या अशाच काही छोट्या क्षणांची ही मैफिल…
विमानाच्या खिडकीतून
मी गोड गोंडस सूर्य पाहिला,
ढगांच्या दुलईत गुरफटलेला.
—————————————————
ढगांची उशी
पांढरी शुभ्र
नक्षी त्यावर सप्तरंग.
————————————————-
तावदानाचा एक तुकडा काढल्यावर
पावसासोबत माझ्या घरात
छोटंसं आभाळ डोकावलं !
———————————————————
भन्नाट पाऊस; हिरवा रानवारा
कोवळ्या ऊन्हात; रानफुलाचा नखरा
ढगांना साज इंद्रधनूचा.
————————————————————
ढगांच्या झिलईतून कोवळा सूर्य झिरपला.
सोनपिवळं ऊन लेऊन नाजूक नखरेल पाऊस आला.
अंगणातल्या बकुळीखाली काल श्रावण बरसला.

(C) २००९ श्रीपाद कुलकर्णी