मंडई ते कम्युनिटी मॉल : एक पूर्ण वर्तुळ

माझा जन्म आणि बालपण पुण्यात, शुक्रवार पेठेत गेलेलं. वाडे, गणपती, मारुति, तालमी, आणि मंडई हे माझ्या त्यावेळच्या पुण्याचे अविभाज्य भाग होते…सारं पुणं देखिल त्याभोवतीच तर गुंफलं गेलं होत.

नुकताच अगदी अचानक सकाळी मंडईत जायचा योग आला. कसबा पेठेत काही काम होतं, गावात गेलो होतो आणि काम संपल्यावर थोडा वेळ हाताशी होता त्यामुळे सहजच मंडईत गेलो. कसबा पेठ, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिंदे आळी, अकरा मारुती, चिंचेची तालीम हे सगळंच माझ्या लहानपणी पाहिलेलं जग माझ्यापुढे उलगडत गेलं. बदल झालेच नाहीत असं नाही, पण तरी आजही या भागात मला ‘पुण्यात आल्यासारखं‘ वाटतं हे खरं आहे.

मंडईत प्रवेश कधी होतो हे नक्की सांगता येतच नाही. मंडईसाठी राखून ठेवलेल्या इमारतीच्या आजूबाजूला, सगळ्याच रस्त्यांतून; गल्लीबोळातून फिरत्या किंवा तात्पुरत्या विक्रेत्यांच्या रेलचेलीने मंडईचं अस्तित्व जाणवायला लागतं. लोखंडी आणि बीडाचे तवे, वेगवेगळ्या प्रकारच्या सु-या, डाव, चमचे आणि उलथणी यांपासून पार चुडा पिंजर यांसारख्या अनेक किरकोळ गोष्टी याठिकाणी दिसायला लागतात.

मंडई जसजशी जवळ येते तसे हे किरकोळ माल बदलायला लागतात… … आता लिंबू, मिर्ची, कोथिंबीर, आलं अशी भाजीवाली किंवा अंजीर, सीताफळं, नारळ, अशी फळवाली मंडळी आपल्याला दिसू लागतात. या सा-याचे घाऊक विक्रेते मंडईत असतातच पण तरी गि-हाईकांसोबतची या किरकोळ विक्रेत्यांची एक आपली नाळ असतेच. या किरकोळांतच तेव्हा लिंबू सरबत, उसाचा रस यांची ही भर असायची. ‘मंडई झाल्यावर‘ ऊसाचा रस प्यायचा यासाठी पिशव्याभरल्या अवघडल्या हातांत आधिच आण्या रुपयांची बेगमी केलेली असायची.

मंडईत प्रवेश करायचा म्हणजे एक मजाच असायची. पुण्याच्या या मंडईत घाऊक आणि किरकोळ अशी दोन्ही विक्री व्हायची तेव्हा व्यापा-यां कडे कायमच गर्दी असायची. सकाळी लवकर गेलं तर प्रत्येक गाळ्यावर पुजेअर्चेची लगबग असायची. देवादिकांच्या तसबिरींना हार घातले जायचे आणि उदबत्तीचा सुगंध दरवळायचा. सकाळच्या विक्रीला सुरुवात करायच्या आधि हा भावपूर्ण कार्यक्रम जवळजवळ सगळ्याच गाळ्यांमध्ये चालायचा.

मग सुरुवात व्हायची मांडणीला. सुबक पद्धतीत मांडून ठेवलेल्या मालाच्या हारीच्या हारी अगदी साध्या कांद्या बटाट्यालाही आकर्षक रुप द्यायच्या. लहानपणी तर मला या मालाच्या मागे बसणारे विक्रेते दिसायचेच नाहीत… …त्यांचा तराजू आणि डोकं येवढंच दिसायचं आणि मालाचे हे ढीग अधिकच मोठ्ठे वाटायचे. मंडईत प्रवेश केल्यापासून एकामागून एक गाळे आपल्या भेटीला येतात… … …कांदे बटाटे, टमाटे, मटार, किंवा वेगवेगळी भाजी असलेले गाळे आपण पार करायला लागतो.

प्रत्येक गाळ्यावर थांबावच लागतं कारण मंडईत खरेदीसोबतच नमस्कार चमत्कारही होतच असतात. ‘का हो अण्णा आज दोन दिवसांनी दिसताय?’ इथपासून ते ‘अहो मामी, तुमची मुलगी आमची भईनच की, आता तिचं लनीन म्हणून हे आमच्याकडून‘ असं म्हणून केळ्याचा एखाददुसरा घडच कुणा लक्षिमीच्या हातात दिला जायचा. ‘आजी कशी गं पेलवायची तुला मंडई…तुझ्या सुनेला न्हाई जाण‘ असं म्हणत एखादा काळजीच्या सुरात आपल्या गाळ्यावरच्या पो-याला आजीसोबत मंडई करायला पाठवायचा. या सगळ्या खरेदीत एक आपुलकी असायची. व्यापारी, गाळेवाले घराघरांना सांधीत व्यापार करायचे. हक्काने दोनएक रुपयांची सूट मागितली जायची, प्रेमाने ती दिलीही जायची. सोबत आलेल्या पोराबाळींच्या हातात आल्याच्या वड्या, लिमलेटच्या गोळ्या प्रेमाने ठेवल्या जायच्या आणि एखाद्या म्हाता-या मावशी-आजीला अस्तुरीच्या बाळंतपणासाठी सल्लेही विचारले जायचे. मंडई अनुभवावी लागते. व्यापारासोबतच इथे समाजाचं, विचारांचंही अभिसरण होत असे. मायेची विचारपूस, प्रेमाचे आणि आशिर्वादाचे दोन शब्द इथे मालासोबतच दिले घेतले जातात यातच या बाजारपेठेची मंडई होण्याचं खरं गुपित आहे हे इथे खरेदीचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. मंडई ही फक्त बाजारपेठ नाही हेच खरं.

सा-याच मोठ्या शहरांतून बदल घडताहेत. मंडईची जागा गेल्याल काही वर्षांत मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर्स, आणि मेगा स्टोअर्सनी घेतली आहे. एकाच छताखाली सारी खरेदी होते, आणि सुईपासून भाजीपाला, कपडे, घरातल्या आधुनिक उपकरणांसुद्धा, मल्टिप्लेक्समध्ये मनोरंजनाची खरेदीही होते. आकर्षकपणे सजवलेला माल असतो. रंग, पोत, आकार यांची काळजी घेत निवडलेल्या रसरशीत भाज्या आणि फळं असतात. चॉकलेटं, केक्स, पेस्ट्रीज यांची देखणी रुपं आपल्याला भुलवतात. हसतमुख आणि मदतीसाठी तत्पर असा सेवकवर्ग आपल्याला खरेदीसाठी मदत करत असतो. काय मिळत नाही या ठिकाणी?

मॉलमध्ये ‘मंडई‘ मिळत नाही. इथे प्रत्येकजण आपापला येतो, निर्जीव वाटणा-या स्टंॅडवरुन आपल्याला हवा तो माल खरेदीसाठी निवडतो, वातानुकूलित, संगीत असणा-या या बाजारात थंडपणे खरेदी करतो आणि पैसे चुकते करुन बाहेर पडतो. खरेदीची मजा, व्यवहारातला आपलेपणा, आणि माणसामाणसांत होणारा संवाद असा अनुभव येतच नाही. खरेदी ही एक व्यवहारी क्रिया होऊन जाते फक्त! मुंबईत राहणा-या माझ्यासारख्या पक्क्या व्यवहारी तरुणाला यात वावगं, वेगळं काही वाटत नाही. सर्व साजाप्रमाणेच मी ही हे बदल स्वीकारले आहेत, अंह…ते मी अगदी अटीतटीने अंगीकारले आहेत.

सकाळची वेळ. एका डिपार्टमेंटल स्टोअरमधलं नेहमीचंच थंड, निर्जीव वातावरण. एक तरुण, नीटनेटकी आणि तडफदार फ्लोअर मॅनेजर इथे कामाला लागत होती. तिच्या चेह-यावर इतरांसारखं नेहमीचंच गोड नाही तर उत्साही, आणि मनमोकळं हसू होतं. एकीकडे ती आपल्या विक्रेत्या चमूला मार्गदर्शन करत होती, दिवसाचं टार्गेट समजावत होती, कालच्या विक्रीचा आढावा घेत होती आणि दुसरीकडे सकाळी लवकर स्टोअरमध्ये येणा-या गि-हाईकांशी हसतमुखाने संवाद साधत होती. ‘गुड मॉर्निंग मॅडम, मे आय हेल्प यू विथ युअर शॉपिंग‘ असं अगदी सहज तिने एका म्हातारीला विचारलं. सगळ्या स्टोअरभर ती त्या म्हातारीसोबत फिरली. म्हातारी सांगेल ते सारं तिच्या ढकलगाडीत टाकत गेली, आणि ढकलगाडी हाकत, त्या म्हातारीशी गप्पा मारत तिला पेमेंट काउंटरपाशी घेऊन आली. म्हातारीने खरेदी केलेला सारा माल पिशव्यांतून भरला, आणि म्हातारीला एक सुखद धक्का देत तिने ते सारं सामान निःशु्ल्क तिच्या घरी पोहोचवायची तयारी दाखवली. क्षणात म्हातारीच्या चेहे-यावरची काळजी दूर झाली, आणि ती त्या मुलीला परत परत कौतुकाने दिवसभरासाठी शुभेच्छा देत बाहेर पडली.

हे सारं पाहीलं आणि नकळत मी मंडईत पोहोचलो. तिथला जिव्हाळा, आपुलकी, आणि व्यावसायिकतेच्या पलिकडे जपली जाणारी नाती यांचं एक छोटसं प्रतिबिंब मला तद्दन बाजारपेठी संस्कृतीत दिसत होतं. आपण जुन्या पद्धती टाकून नव्यांचा स्वीकार करतो आहोत, मात्र जुन्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी नव्यात पर्याय आणि जागा उपलब्ध करुन देणं गरजेचंच आहे. शेवटी माणूस म्हणून आजही आपल्याला समाजाची, सामाजिक अभिसरणाची आणि प्रत्यक्ष संवादाची भूक आहेच की!